खान्देशगुन्हेजळगांव

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

१.७१ लाखांचे पाच मोबाईल जप्त; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासामुळे गुन्हा उघड

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

१.७१ लाखांचे पाच मोबाईल जप्त; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासामुळे गुन्हा उघड

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात घडलेल्या महागड्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेला आयफोनसह एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत सुरेश नारखेड यांनी ४ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २९ मे रोजी जळगावच्या नवीन बसस्थानकात कामानिमित्त आले असता त्यांच्या पँटच्या खिशातून १ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा iPhone 17 Pro अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तसेच तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान तांबापुरा परिसरातून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला आयफोन 17 प्रोसह विविध कंपन्यांचे आणखी चार मोबाईल फोन असा एकूण १.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ किरण वानखेडे, रविंद्र ठाकरे, नरेंद्र दिवेकर, अमित मराठे आणि प्रविण जाधव यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.

मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button