
शेअर बाजारात लाखोच्या नफ्याचा मोह नडला ; सायबर भामट्यांनी उद्योजकाला २.५५ कोटींचा चुना लावला !
जळगाव (प्रतिनिधी) : “एका दिवसात लाखो रुपयांचा नफा” असे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी पॅकेजिंग इंडस्ट्रीजच्या मालकाला तब्बल २ कोटी ५५ लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २२ दिवसांत घडला असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (वय ४२, रा. तारा बिझनेस पार्क, कुसुंबा, ता. जळगाव) यांना व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधून काही जणांनी स्वत:ला “RUSL-C CM” या शेअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. “अधिक गुंतवणूक करा, मोठा नफा मिळवा” असे सांगून त्यांनी लोखंडवाला यांच्याकडून २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत १३ वेळा मिळून २.५५ कोटी रुपये उकळले.
भामट्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४९,५०० रुपयांचा नफा दाखवून ती रक्कम काढण्यासही परवानगी दिली. त्यानंतर लोखंडवाला यांनी ५० हजारांपासून ४० लाखांपर्यंतच्या हप्त्यांत सतत पैसे गुंतवले.
दरम्यान, गुंतवणूक वाढत गेल्यावर लोखंडवाला यांनी रक्कम परत मागितल्यावर त्यांना नवनवीन अटी घालण्यात आल्या. १ कोटी गुंतवल्यानंतर विड्रॉलसाठी साडेतीन कोटी भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर गुंतवणूक २.५५ कोटींवर पोहोचली. या बदल्यात अॅपवर १५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र रक्कम काढण्यासाठी पुन्हा गुंतवणुकीचा दबाव आणल्यानंतर अखेर फसवणूक उघडकीस आली.
या प्रकरणात संबंधित मोबाईल नंबर व अॅप लिंकच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.





