
क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी; दोन जणांना अटक, लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. भुसावळातील सिंधी कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संशयितांकडून तब्बल १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला प्रकाश हुदामल कारडा (५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हा आपल्या घरातून ऑनलाईन सट्टेबाजीचे अड्डे चालवत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने छापा टाकला असता, कारडा आणि त्याचा साथीदार रणजीत चत्रभान हंडी (३५, रा. गणपतीनगर) हे प्रत्यक्ष सट्टेबाजी करताना आढळले.
कारवाईत मोबाईल, लॅपटॉपसह सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





