खान्देशगुन्हेजळगांवशासकीय

पाचोरा शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले ; जनजीवन विस्कळीत

पाचोरा शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले ; जनजीवन विस्कळीत

घरात, दुकानात पाणी शिरून संसारोपयोगी वस्तू, पिकांचे प्रचंड नुकसान

पाचोरा : शहरासह परिसरात रविवारी रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीने हिवरा नदीला पूर आल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरून संसारोपयोगी वस्तू, पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नगर परिषद व स्थानिक प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू करत सुमारे १ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून निवाऱ्याची व्यवस्था केली. तर जारगाव येथील प्रकाश पाटील हा तरुण नदीच्या पाण्यात वाहून गेला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

सोमवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बाधित कुटुंबांशी संवाद साधत शासनाकडून तत्काळ मदत दिली जाईल, असा विश्वास दिला. त्यांच्या सोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील उपस्थित होते. या वेळी मंत्री महाजन म्हणाले की, पाचोरा शहर व तालुक्यातील पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली.

शहरातील कृष्णापुरी, बहिरम नगर, जनता वसाहत, शिव कॉलनी, हनुमान नगर आदी भागातील घरे जलमय झाली आहेत. तर खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा, तारखेडा, अंतुर्ली, लोहटार या गावांमध्येही पुराचा मोठा फटका बसला असून घरे, पशुधन, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृष्णापुरी पुल, रेल्वे भुयारी मार्गासह काही महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

महसूल प्रशासन व नगरपालिकेच्या २०-२५ पथकांनी युद्धपातळीवर पंचनामे सुरू केले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठावर गर्दी करू नये व पशुधन सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन केले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल दाखल झाल्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून मदतकार्य सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button