तांबापुरा येथील सराईत गुन्हेगार समीर काकरवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई

तांबापुरा येथील सराईत गुन्हेगार समीर काकरवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. विस्मील्ला चौक, तांबापुरा) याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता (एम.पी.डी.ए.) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातून अटक करून त्याला थेट येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
समीर काकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत, घरफोडी यांसह एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तांबापुरा, मेहरुण व जळगाव शहर परिसरात त्याची मोठी दहशत होती. सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण, शिवीगाळ करणे, तसेच टोळक्यासह दहशत निर्माण करणे अशा कारवाया तो वारंवार करीत असे. यापूर्वी त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते, मात्र तरीदेखील त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती.
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनकडून एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांनी तो जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. त्यानुसार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून काकरला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.





