भरदिवसा बंद घरातून सोन्या चांदीचे दागिने लांबवले !

भरदिवसा बंद घरातून सोन्या चांदीचे दागिने लांबवले !
भुसावळ | प्रतिनिधी नॉर्थ कॉलनीसारख्या गजबजलेल्या रहिवासी परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (१० जून) अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
फिर्यादी चेतन चंद्रमणी शिंदे हे संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता असून, आपल्या कुटुंबासह नॉर्थ कॉलनीत वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता चेतन शिंदे व त्यांचे वडील कामावर गेले, तर आई व बहिण रेल्वे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या होत्या. त्यांनी १२ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी परतल्यावर मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील लॉकर फोडून तीन तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याचे झुमके, सोन्याचे टॅप्स (५ ग्रॅम), चार ग्रॅमची पोत तसेच अर्धा किलो चांदीचे कडे-पाटले असा एकूण १,८७,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
घटनेची माहिती मिळताच चेतन शिंदे यांनी तत्काळ भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.