खान्देशजळगांवसामाजिक

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा ; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा ; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव | प्रतिनिधी शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रशासनाची तातडीची आढावा बैठक

याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी तसेच पेट्रोल-डिझेल पुरवठादार यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठा, पुरवठा व्यवस्था आणि उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पेट्रोल पंपांवर पाहणी

परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासमवेत शहरातील विविध पेट्रोल पंपांना भेट देत पाहणी केली. जिल्ह्यात एकूण ३७१ पेट्रोल पंप असून सर्वत्र पर्याप्त इंधनसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पेट्रोल पंपांवर तात्पुरता साठा संपला आहे, त्या ठिकाणी तातडीने नवीन साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरवठा व्यवस्था सुरळीत

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. HPCL, BPCL, IOCL, नायरा आणि रिलायन्स या कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू असून ट्रान्झिटमधूनही मोठ्या प्रमाणावर इंधन जिल्ह्यात दाखल होत आहे.
संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवली जात असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई निर्माण झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. भीतीपोटी अतिरिक्त इंधनसाठा करू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असेही सांगण्यात आले आहे.अफवांमुळे वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे. चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

हेल्पलाइनवर संपर्काचे आवाहन

नागरिकांना काही तक्रार किंवा शंका असल्यास ०२५७-२२२३१८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे तसेच dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button