खान्देशजळगांव

पुण्यातील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जळगावच्या आराध्य परदेशीची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले कांस्यपदक

पुण्यातील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जळगावच्या आराध्य परदेशीची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले कांस्यपदक

जळगाव: पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस दल ‘पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी’चा खेळाडू आराध्य आकाश परदेशी याने चमकदार कामगिरी करत भारतासाठी कांस्यपदक (तृतीय क्रमांक) पटकावले आहे. अवघ्या आठ वर्षांच्या आराध्यने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिनांक २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन, इंडिया तायक्वांदो आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २२ देशांतील मातब्बर खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. भारतामधूनही निवडक प्रतिभावान खेळाडू रिंगणात उतरले होते.

यात किड्स गटामध्ये (८ वर्षे वयोगट) २० किलो वजनी गटामध्ये आराध्य आकाश परदेशी याने भारताचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चुरशीच्या लढतींमध्ये आराध्यने उत्कृष्ट तंत्र आणि चपळतेचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. पदक पटकावून जळगावात परतलेल्या या चिमुकल्या खेळाडूचे क्रीडाक्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक
आराध्यच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव भाग), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव भाग) तसेच पोलीस वेल्फेअर (मानव संसाधन) विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे आणि पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीत घेतला सराव
आराध्य हा जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी’ येथे नियमित सराव करतो. त्याला महिला पोलीस व तायक्वांदो प्रशिक्षक अश्विनी निकम (जंजाळे), जागृती काळे (महाजन), जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव राजेंद्र मनोहर जंजाळे आणि तायक्वांदो प्रशिक्षक प्राजक्ता सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button