खान्देशजळगांव

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी यशस्वीरीत्या काढली

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी यशस्वीरीत्या काढली

१८ वर्षीय तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार; कान, नाक व घसा विभागाच्या पथकाची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिन वापरणे एका १८ वर्षीय तरुणीला महागात पडले. दात साफ करताना पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक पिन बाहेर काढली.

प्रक्रियेदरम्यान गंभीर धोका

अन्ननलिकेत अडकलेली टोकदार पिन काढताना अन्ननलिकेला छिद्र पडणे, रक्तस्राव होणे आणि श्वसनमार्गात पिन जाणे अशा गुंतागुंतींची शक्यता होती. डॉक्टरांनी आवश्यक ती खबरदारी घेत ही प्रक्रिया यशस्वी केली.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, सहयोगी प्राध्यापक डॉ. अक्षय सरोदे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललित राणे, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. विनोद पवार, डॉ. दीपिका ओक, डॉ. अनिकेत दौंड, कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. किरण गोरे, डॉ. यश सिसोदे आणि डॉ. साक्षी पोखरणा यांनी सहभाग घेतला.

भूलशास्त्र विभागाचे योगदान

भूलशास्त्र विभागातील डॉ. ऋतुराज काकड, डॉ. चेतनकुमार अद्राट, डॉ. नेहा पाटील व डॉ. समीर तडवी यांनी सहकार्य केले. मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका रूपाली पाटील आणि अश्विनी सोनवणे यांनीही मदत केली. दोन्ही विभागांच्या समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण झाली.

नागरिकांना सावधगिरीचे आवाहन

दातांतील अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिन, सुई किंवा अन्य टोकदार वस्तू वापरू नयेत. अशा वस्तू चुकून गिळल्या गेल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. अक्षय सरोदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button