
शामनगरमधील घरफोडीप्रकरणी एकाला अटक; दोन साथीदारांचा शोध सुरू
संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि टीव्ही जप्त

जळगाव : शहरातील शामनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत रामानंदनगर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जळगाव रेल्वेस्थानकावरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात अन्य दोन जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांचा शोध सुरू आहे.
पंढरपूरला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी
शामनगर येथील किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी घरी परतल्यानंतर दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, ४३ इंची टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे आढळले. यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तांत्रिक तपासानंतर संशयिताला अटक
पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. त्यातून राजीव गांधी नगर परिसरातील शक्तीसिंग ऊर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याचा सहभाग निष्पन्न झाला. १९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना संशयित जळगाव रेल्वेस्थानकावरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या पथकाने त्याला तेथून ताब्यात घेत अटक केली.
पोलिस कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजितसिंग भोंड यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने, मंगळसूत्र, चांदीचा गोफ, ब्रेसलेट, तोरड्या, देव, कडे, फुलपात्र आणि ४३ इंची टीव्हीचा समावेश आहे.
या गुन्ह्यातील सुबेरसिंग टाक आणि शेरुसिंग भोंड हे दोघे अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वारुंगसे, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, उपनिरीक्षक संजय तडवी आणि गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.




