
बियाणी कुटुंबाच्या जमीनधारणेची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय चौकशी सुरू
महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा कायद्यानुसार कारवाई; आठ दिवसांत जमिनींचे विवरण व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

भुसावळ | प्रतिनिधी
बियाणी कुटुंबाच्या जमीनधारणेबाबत महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम १४ व १६ अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील कुळकायदा शाखेकडून शासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाच्या मालकीच्या तसेच त्यांच्या ताब्यातील जमिनींचे सविस्तर विवरण आणि आवश्यक कागदपत्रे आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी ५ एप्रिल २०२३ आणि १ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर या प्रकरणाची प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू झाली.
अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश पारित केला. त्यानुसार महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम १४ व १६ अन्वये शासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आठ दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश
या चौकशीच्या अनुषंगाने श्रीमती कांताबाई बंसीलाल बियाणी यांना त्यांच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या व धारण केलेल्या जमिनींचे सविस्तर विवरण आणि संबंधित कागदपत्रे आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश तहसीलदार विजय सूर्यवंशी (कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव) यांनी दिले आहेत.
तसेच तहसीलदार, भुसावळ यांनाही संबंधित जमिनींचे सातबारा उतारे, महसुली नोंदी, आवश्यक कागदपत्रे आणि मूळ संचिका आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी. जमीनधारणेची कायद्यानुसार तपासणी करून काही अनियमितता किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच शासनाच्या जमीनविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केली आहे.
या प्रकरणातील चौकशी सुरू झाली असून, संबंधित कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाही होणार आहे.




