
महापालिका अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशाने डेरेदार कडुनिंबाच्या झाडावर कुऱ्हाड
बी.जे. मार्केट परिसरातील घटना; सतर्क वृक्षप्रेमींनी झाडतोड रोखली

जळगाव (प्रतिनिधी) : एकीकडे पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे जळगाव शहरातील बी.जे. मार्केट परिसरात डेरेदार कडुनिंबाच्या झाडावर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेतील सपकाळे नावाच्या अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून तीन ते चार मजूर झाड तोडण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सतर्क पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत झाडतोड रोखल्याने झाड वाचले.
रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. वीज वितरणाच्या डीपीला झाड अडथळा ठरत असल्याचे कारण देत मजुरांनी कडुनिंबाच्या झाडावर कुऱ्हाड चालविण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, याच दिवशी जळगाव महापालिकेची महासभा सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
झाडाच्या मोठ्या फांद्या आणि खोडाचा काही भाग तोडला

झाडतोड सुरू असल्याचे लक्षात येताच काही पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत मजुरांना झाड मुळापासून तोडण्यापासून रोखले. त्यामुळे संपूर्ण झाड तोडण्याचा प्रकार थांबला. मात्र, तोपर्यंत झाडाच्या निम्म्याहून अधिक फांद्या आणि खोडाचा मोठा भाग तोडण्यात आला होता.
या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधितांना जाब विचारला असता, महापालिकेतील सपकाळे नामक अधिकाऱ्याने डीपीला झाड अडथळा ठरत असल्याचे कारण देत तोंडी आदेश दिल्यामुळे झाड तोडण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. मात्र, झाड तोडण्यासाठी आवश्यक परवानगी नसताना अशा प्रकारे वृक्षतोड कशी करण्यात आली, असा सवाल वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची महापालिका प्रशासन दखल घेऊन संबंधितांवर काय कारवाई करणार, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.




