
कर्जाचा डोंगर आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या; विदगावात हळहळ
दिव्यांग असूनही जिद्दीने करायचे शेती; पिकांचे नुकसान आणि कर्जफेडीच्या चिंतेत उचलले टोकाचे पाऊल
जळगाव : शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान, अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या विदगाव येथील शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन पद्माकर पाटील (वय ४८, रा. विदगाव, ता. जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गजानन पाटील हे दिव्यांग असतानाही मोठ्या जिद्दीने शेती व्यवसाय करीत होते. शेतीच्या कामासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातच यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडली होती.
या परिस्थितीमुळे ते चिंतेत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.




