खान्देश टाईम्स न्यूज | १० नोव्हेंबर २०२३ | जळगाव तहसील कार्यालयात महसूल शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी परवेज शेख यांची काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत बदली करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार शेख सध्या रजेवर असून असे असताना देखील ते तहसील कार्यालयात कार्यरत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जळगाव तहसील कार्यालयात महसूल शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी परवेज शेख यांच्याविरुद्ध तक्रारी आल्याने तसेच खान्देश टाईम्स न्यूजने वृत्त प्रकाशित केल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत बदली झाल्यानंतर शेख तिथेच कार्यरत होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून परवेज शेख हे सुट्टीवर असून दि.२३ नोव्हेंबर पर्यंत त्यांची रजा आहे.
शेख रजेवर असताना देखील गेल्या दोन दिवसापासून जळगाव तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. तहसीलदार नामदेव पाटील यांचे दालन ते कार्यालयातील इतर विभगात ते फिरत असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार नामदेव पाटील यांना याबाबत विचारणा केली असता, परवेज शेख हे रजेवर असले तरी काही कामानिमित्त त्यांना बोलाविण्यात आले आहे. त्यांची आस्थापना तहसील कार्यालय असल्याने आणि आमच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना बोलाविण्यात आले होते. कागदपत्रांबाबत काही माहिती शेख यांना असल्याने त्यांना मदतीसाठी आम्ही बोलाविले आहे, त्यांचा हेतू चुकीचा नाही, असे तहसीलदार यांनी सांगितले.
दरम्यान, या विषया संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.