खान्देशजळगांवराजकीयशासकीय

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत राजकीय संघर्ष विकोपाला; आ. किशोर पाटील यांचा आ. मंगेश चव्हाण यांच्यावर थेट निशाणा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत राजकीय संघर्ष विकोपाला; आ. किशोर पाटील यांचा आ. मंगेश चव्हाण यांच्यावर थेट निशाणा

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. भाजपचे आ. मंगेश चव्हाण आणि शिवसेना (शिंदे गट) चे आ. किशोर आप्पा पाटील यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला असून, आ. किशोर पाटील यांनी आ. चव्हाण यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत थेट राजकीय आव्हान दिले आहे. “जिल्हा बँकेचे तर सोडाच, पण त्यांनी आधी आपली आमदारकी वाचवून दाखवावी,” असे वक्तव्य आ. पाटील यांनी केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या वैधतेवरून सुरू झालेला हा वाद आता दोन आमदारांमधील थेट संघर्षात रूपांतरित झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप आ. किशोर पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रारीचा इशारा

निवडणूक आचारसंहिता आणि नियम बाजूला ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा आ. पाटील यांनी केला आहे. वैध आणि अवैध उमेदवारी अर्जांबाबतचे निर्णय प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ जिल्हा बँकेपुरता मर्यादित विषय नसून लोकशाही आणि प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सहकार आयुक्तांकडे करणार असल्याचा इशाराही आ. किशोर पाटील यांनी दिला आहे.

मुलाच्या वक्तव्याचे समर्थन करत लगावला टोला

या राजकीय वादादरम्यान आ. किशोर पाटील यांच्या मुलाने केलेल्या वक्तव्यावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “बाप तसा बेटा, खाण तशी माती,” असे म्हणत आ. पाटील यांनी मुलाच्या भूमिकेचे समर्थन केले. स्वाभिमानाला ठेच पोहोचल्यास त्याला प्रत्युत्तर देणे चुकीचे नसल्याचे सांगत, दुसऱ्यांकडे बोट दाखविणाऱ्यांनी आधी स्वतःच्या गिरेबानात डोकावून पाहावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख आमदारांमधील या शाब्दिक चकमकीमुळे जळगाव जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button