खान्देशगुन्हेजळगांव

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने ५१.२० लाखांची फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने ५१.२० लाखांची फसवणूक

सात जणांची रक्कम विविध खात्यांवर वर्ग; एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन सात जणांची ५१ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तेजस युवराज रेडे, युवराज दत्तात्रय रेडे, नयना युवराज रेडे आणि हिमाणी ऊर्फ हिना युवराज रेडे यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दीपक माधवराव सुरळकर (वय ४३, रा. जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, तेजस रेडे याने शेअर बाजारातील व्यवहारांचा संदर्भ देऊन गुंतवणुकीसाठी विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाइन माध्यमातून पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले. गुंतवणुकीवर ५ ते ८ टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आश्वासन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विविध खात्यांवर रक्कम वर्ग

१४ ऑगस्ट २०२५ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने रक्कम पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुरुवातीला परतावा मिळत असल्याचा विश्वास निर्माण करून पुढील गुंतवणुकीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. मात्र, ठरलेली मुदत संपल्यानंतर मुद्दल आणि परतावा मागितला असता टाळाटाळ करण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

धनादेश बँकेतून परत

गुंतवणुकीच्या व्यवहारांशी संबंधित काही धनादेश बँकेत सादर केल्यानंतर ‘Drawer Signature Differs’ असा शेरा देऊन परत करण्यात आले. यानंतर सुरळकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

फिर्यादीत नमूद तपशिलानुसार, दीपक माधवराव सुरळकर यांचे ३ लाख रुपये, समेश विष्णू सुरळकर यांचे १५ लाख ५० हजार रुपये, रमेश प्रभाकर फडके यांचे २ लाख रुपये, मानसी फडके यांचे १ लाख रुपये, पुष्पजित गोविंद पाटील यांचे ९ लाख ७० हजार रुपये, हर्षदा महेश सोनार यांचे १५ लाख रुपये आणि सचिन आनंदाराम देसले यांचे ५ लाख रुपये, अशी एकूण रक्कम ५१ लाख २० हजार रुपये आहे.

गुन्हा दाखल; तपास सुरू

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.५१ वाजता गुन्हा क्रमांक ०३७१/२०२६ दाखल झाला. भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ तपास करीत आहेत. गुंतवणुकीची रक्कम कुठे वळविण्यात आली आणि या प्रकरणात आणखी कोणी बाधित आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button