राजकीयजळगांव

विधानपरिषद निवडणूकी मध्ये अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा

महायुतीतील कलहाचा फायदा होणार ?

विधानपरिषद निवडणूकी मध्ये अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा

महायुतीतील कलहाचा फायदा होणार ?

जळगाव l प्रतिनिधी l विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. महायुतीतील घटक पक्ष एकजूट असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीचे गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा सर्वाधिक फायदा अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नंदकिशोर महाजन हे मंत्री गिरीश महाजन यांचे उमेदवार असल्याचे विधान केले. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच गिरीश महाजन यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत, उमेदवार हा भाजपाचा आहे, कोणत्याही एका नेत्याचा नाही, असे स्पष्ट केले. या परस्परविरोधी भूमिकांमुळे भाजपातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विशेष म्हणजे, महायुतीच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयाबाबतही विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित उत्साह नसल्याचे बोलले जात असून, स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. चौधरी यांची राजकीय वाटचाल अनेक पक्षांच्या नेत्यांशी जवळीक असलेली राहिली आहे. ते मूळचे शिवसैनिक असले तरी काही काळ त्यांनी भाजपाशीही राजकीय संबंध ठेवले होते. त्यामुळे विविध पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय निष्ठेपेक्षा वैयक्तिक संबंध आणि स्थानिक समीकरणांना अधिक महत्त्व असते. अशा परिस्थितीत महायुतीतील अंतर्गत धूसफूस वाढल्यास काही मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा थेट लाभ चौधरी यांना मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही निवडणूक केवळ पक्षीय ताकदीची नसून नेत्यांमधील समन्वय, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि वैयक्तिक संबंधांचीही कसोटी ठरणार आहे. महायुतीतील मतभेद अधिक तीव्र झाले, तर निवडणुकीच्या निकालात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे, महायुतीतील कलहाचा सर्वात मोठा लाभार्थी अनिल चौधरी ठरणार का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button