
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्हाभरात धडक मोहीम; २७ गुन्हे दाखल
१,१०३ लिटर गावठी दारू, ७०० लिटर कच्चे रसायन जप्त; १.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत २७ गुन्हे नोंदविण्यात आले असून २७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईत एकूण १ लाख ३४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१,१०३ लिटर गावठी दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी विविध भागात छापे टाकून १,१०३ लिटर गावठी हातभट्टी दारू, ४१ देशी दारूच्या बाटल्या, ७०० लिटर कच्चे रसायन आणि ९० लिटर पक्के रसायन जप्त केले. अवैध मद्यनिर्मिती व विक्री रोखण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
एरंडोल, कासोदा आणि ४० गाव परिसरात मोठी कारवाई
एरंडोल येथे दोन कारवायांमध्ये ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ६५ लिटर गावठी दारू, २०० लिटर कच्चे रसायन आणि ५० लिटर पक्के रसायनाचा समावेश आहे. कासोदा येथे २६ हजार ८०० रुपयांचे ५०० लिटर कच्चे रसायन व १८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर ४० गाव शिवार परिसरात २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत ५३० लिटर गावठी दारू आणि ४० लिटर पक्के रसायन नष्ट करण्यात आले.
अमळनेर, भडगाव आणि फत्तेपूरमध्येही कारवाई
अमळनेर येथे तीन गुन्ह्यांमध्ये ९५ लिटर गावठी दारू जप्त करून ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. भडगाव येथे तीन गुन्ह्यांमध्ये ६५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. फत्तेपूर येथे २० लिटर गावठी दारू आणि १८० एमएल क्षमतेच्या आठ देशी दारूच्या बाटल्या जप्त करून २ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जिल्हाभरात कारवायांची मालिका
एमआयडीसी, शनिपेठ, जिल्हापेठ, भुसावळ, चोपडा, धरणगाव, मारवड, पारोळा, पाचोरा, पिंपळगाव, पहूर, यावल, रावेर, सावदा, मुक्ताईनगर, निंभोरा आणि इतर ठिकाणीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अवैध मद्यव्यवसायावर आळा घालण्याचा प्रयत्न केला.
अवैध मद्यविक्रीविरोधातील मोहीम कायम
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती विभागाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.





