
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कथित अपमानाविरोधात भुसावळात काँग्रेसचा निषेध सत्याग्रह
‘रघुपती राघव राजाराम’च्या भजनातून समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर
भुसावळ, दि. १६ ऑगस्ट : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकाराचा निषेध करण्यासाठी भुसावळातील यावल नाका परिसरात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पूर्व आणि जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने निषेध सत्याग्रह करण्यात आला.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींचे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गात शांततामय पद्धतीने आंदोलन केले. संबंधित घटनेच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि समान प्रतिष्ठेचा अधिकार दिला आहे. जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणाचाही अपमान करण्याच्या प्रवृत्तीला समाजात स्थान नसावे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली.
मागासवर्गीय समाजातून पुढे येऊन देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थान मिळविणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात घडलेला प्रकार हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या संविधानिक मूल्यांना धक्का देणारी मानसिकता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अशा प्रवृत्ती काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या भावनेतून समाजात समता, बंधुता, एकात्मता आणि परस्पर सन्मानाची भावना मजबूत करण्याचा संकल्प आंदोलनादरम्यान करण्यात आला. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या छायाचित्राला दूधाचा अभिषेक करून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाला जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमील शेख, माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिरीषदादा चौधरी, मुफ्ती हारून नदवी, योगेंद्र भैय्या पाटील, किरण राजमल पाटील, रवींद्र निकम, हरीश गंडवानी, ज्ञानेश्वर कोळी, अनंत परिहार, राजेंद्र पाटील, देवा भाऊ ठाकरे, वाय. एस. महाजन, कैलास शेळके, राहुल भालेराव, जगदीश गाडे, मुन्वर खान, प्रवीण सुरवाडे, इस्माईल गवळी, फयाज हुसैन, ऐश्वरी राठोड, शैलेश बोदडे, अश्फाक काझी, संतोष साळवे, राजेश डोंगरदिवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





