जळगावच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसाठी अनोखा उपक्रम

जळगावच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसाठी अनोखा उपक्रम
सनिका आणि अर्णव धिवरे यांच्या पुढाकारातून मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : समाजातील वंचित आणि गरजू घटकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी विशेष उपक्रम राबविण्यात आला. सनिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या आणि कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील लहान मुलांना शासकीय निवासस्थानी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची, शाळेतील प्रगतीची आणि कौटुंबिक परिस्थितीची आस्थेने विचारपूस केली. मुलांनीही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. या आपुलकीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
या उपक्रमांतर्गत मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. दैनंदिन संघर्षमय जीवनात अनेक मूलभूत गरजांपासून वंचित राहणाऱ्या या मुलांसाठी हा उपक्रम आनंददायी ठरला. नवीन कपडे आणि शूज मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
केवळ वस्तूंचे वाटप न करता मुलांना शासकीय निवासस्थानी आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या शिक्षणाबाबत जाणून घेणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी मिळावी, त्याने आनंदाने जगावे आणि स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
सनिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचा संदेश दिला. वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.




