इतरजळगांव

जळगाव आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसवा

जळगाव आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसवा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे अशपाक शाह यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी इन-आऊट बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा तातडीने बसविण्यात यावी, अशी मागणी अशपाक शाह यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय

जळगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून अनेक नागरिक वाहनांची मालकी हस्तांतरित करणे, बँकेचा बोजा चढविणे, वाहन परवाना नूतनीकरण, वाहन पासिंग तसेच इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात येतात. मात्र, अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. घरातील कामे सोडून कार्यालयात आलेल्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तक्रारींची दखल घेण्याची मागणी

कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा केल्यास काही जणांकडून टाळाटाळ करणारी उत्तरे दिली जातात, तसेच वरिष्ठांकडे तक्रार करण्यास सांगितले जाते, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. शासनाकडून वेतन मिळत असतानाही कार्यालयीन वेळेचे पालन होत नसल्याची बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्येवर उपाय म्हणून जळगाव आरटीओ कार्यालयात इन-आऊट बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा तातडीने बसवून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी अशपाक शाह यांनी केली आहे. शाह हे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून, त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button