
रस्ता लुटीचा 24 तासांत उलगडा; रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद
रावेर : मजूर मिळवून देण्याचे आमिष दाखवत बांधकाम ठेकेदाराला शेतात नेऊन चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या तिघांना रावेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनावल येथील बांधकाम ठेकेदार शेख जाबीर शेख अमान (वय 41) यांना 4 जुलै रोजी मुस्तकीम नावाच्या युवकाने फोन करून दोन मजूर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी मुस्तकीमने त्यांना विवरा येथे बोलावून मजूर अजंदा गावात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो त्यांना अजंदा रेल्वे पुलाजवळ घेऊन गेला, जिथे त्याचे दोन साथीदार आधीच थांबलेले होते.
मजुरीबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने तिघांनी फिर्यादीला शेतात नेले. तेथे एका आरोपीने चाकूचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. फिर्यादीकडील 500 रुपये हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि जबरदस्तीने फोन-पेचा पिन विचारून विविध खात्यांमध्ये 8 हजार रुपये वळते केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 334/2026 दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र रात्रीची वेळ असल्याने आरोपींची ओळख स्पष्ट होत नव्हती.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी मुस्तकीमला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या दोन साथीदारांसह लुटीची घटना घडवून आणल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख मुस्तकीम शेख अकील (वय 22, रा. फतेहनगर, रावेर), शेख मोईन शेख नईम (वय 19, रा. खिर्डी रोड, विवरा) आणि फैजल बेग हिदायत बेग (वय 19, रा. शंकर प्लॉट, रावेर) यांचा समावेश आहे.
पोलिस तपासात शेख मोईन हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांकडून आणखी काही लुटीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकाने केली.





