खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

जळगाव जिल्हा बँकेसाठी महायुतीचा १०-७-४ फॉर्म्युला निश्चित?

२१ जागांसाठी उमेदवारांची संभाव्य यादी चर्चेत; अधिकृत घोषणेकडे लक्ष

जळगाव जिल्हा बँकेसाठी महायुतीचा १०-७-४ फॉर्म्युला निश्चित?

२१ जागांसाठी उमेदवारांची संभाव्य यादी चर्चेत; अधिकृत घोषणेकडे लक्ष

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीने जागावाटपाची रणनीती निश्चित केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. भाजपला १०, शिवसेना शिंदे गटाला ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४ जागा असा १०-७-४ फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे. २१ जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम झाल्याची चर्चा असून, अधिकृत घोषणेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या सत्तेच्या लढाईत मंत्री, आमदार, माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवार निवडताना पक्षीय समतोल, राजकीय ताकद आणि स्थानिक समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे मानले जात आहे.

विकास सोसायटी मतदारसंघात दिग्गजांची नावे

चाळीसगाव विकास सोसायटी मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण (भाजप), पाचोरा येथून सुमित पाटील (शिवसेना शिंदे गट), पारोळ्यातून नलिनी पाटील, एरंडोलमधून मृणाल पाटील (शिवसेना शिंदे गट), अमळनेरमधून जयश्री अनिल पाटील, धरणगावमधून सोनल पवार, चोपड्यातून रोहित निकम (भाजप), जळगाव तालुक्यातून पालकमंत्री गुलाबराव पाटील, भुसावळमधून रजनी सावकारे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, बोदवडमधून हरीश पाटील (शिवसेना शिंदे गट), मुक्ताईनगरमधून रक्षा खडसे, रावेरमधून राजू ठेकेदार आणि यावलमधून विनोद पाटील यांची नावे संभाव्य यादीत असल्याचे सांगितले जात आहे.

राखीव मतदारसंघांतही महत्त्वाची नावे

महिला राखीव मतदारसंघातून भाजपच्या जयश्री महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पद्माताई देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. इतर संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, तर ओबीसी मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एसटी राखीव मतदारसंघातून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे नाव पुढे आले आहे. एनटी राखीव मतदारसंघासाठी रावेरचे सुरेश धनके आणि चाळीसगावचे राजेंद्र राठोड यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

दहा-सात-चारच्या फॉर्म्युल्याने राजकीय समीकरणे

भाजप १०, शिवसेना शिंदे गट ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ अशा जागावाटपातून तिन्ही पक्षांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. सहकार क्षेत्रातील प्रभावी नेत्यांसह राजकीय घराण्यांनाही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या संभाव्य यादीतून दिसून येतो.

मात्र, उमेदवारांची नावे आणि जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाल्याची पुष्टी नसल्याने या यादीकडे संभाव्य यादी म्हणूनच पाहिले जात आहे. वरिष्ठ नेत्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब आणि उमेदवारी अर्जांच्या अंतिम प्रक्रियेनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी महायुतीची ही रणनीती प्रत्यक्ष निवडणुकीत कितपत यशस्वी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button