
चाळीसगाव येथे २५ लाखांचा गांजा जप्त, संशयिताला अटक
चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे मालेगाव रोडवरील बायपास चौफुली परिसरात नाकाबंदी दरम्यान कारवाई करत २५ लाख रुपयांच्या गांजासह एका संशयिताला अटक केली. या कारवाईत गांजाची वाहतूक करणारे चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव शेख नदीम शेख बशीर (वय ४०, रा. गुलवानी खालदा, गल्ली क्र. ३, मालेगाव, जि. नाशिक) असे आहे. गस्तीवर असताना पोलिसांनी पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर (एम.एच.१२ के.एन.२३०५) या वाहनाची तपासणी केली. डिक्कीत निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजासारख्या वासाचा पदार्थ आढळून आला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता, ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा आढळून आला, ज्याचे बाजारमूल्य अंदाजे २४ लाख ६९ हजार १५० रुपये आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर, तसेच हवालदार, नाईक आणि महिला पोलीस शिपाई यांचा समावेश असलेल्या पथकाने सहभाग घेतला.