
अबू आझमी यांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात समाजवादी पार्टीचे निवेदन
जळगाव: महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या दिवशी, ३ मार्च २०२५ रोजी, समाजवादी पार्टीचे राज्य अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. या संवादादरम्यान त्यांनी औरंगजेब यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य केले.
या विधानानंतर त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करत त्यांना विधानसभा अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. त्यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू ठेवला नव्हता आणि त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली. तरीदेखील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.
आझमींना धमक्या : सुरक्षा पुरवण्याची मागणी
निलंबनानंतर मा. अबू आसिम आझमी यांना सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असून त्यांचा जीवितास धोका निर्माण झाला आहे. ते ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असून, यापूर्वी राज्यसभेचे सदस्य तसेच चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही थोर व्यक्तीचा अवमान केलेला नाही, तरीदेखील त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचे समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
समाजवादी पार्टीच्या जळगाव विभागाने निवेदन देत राज्य सरकारकडे मागणी केली की,
1. अबू आसिम आझमी यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे
2. त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी
ही मागणी करण्यासाठी समाजवादी पार्टीच्या प्रदेश सचिव रईस बागवान यांच्या नेतृत्वाखाली रिझवान जहागिरदार (महानगराध्यक्ष), आसिफ पटेल (अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष), रईस सलीम बागवान (महानगर उपाध्यक्ष), फहीम पटेल (महानगर सचिव), दानिश शेख (महानगर उपाध्यक्ष) आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे समाजवादी पक्षाने अबू आसिम आझमी यांच्या निलंबनाच्या विरोधात आवाज उठवला असून, सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.