
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कारभारावर संताप; कामगारांना पुन्हा रुजू करण्याची मागणी
न्यूरोसर्जन नियुक्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा; माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांचे निवेदन
जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापन आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून स्मार्ट कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात माजी नगरसेवक अशोक एस. लाडवंजारी यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे, कामावरून कमी करण्यात आलेल्या साई मल्टी सर्व्हिसेसच्या ६० ते ८० कामगारांना तातडीने पुन्हा रुजू करून घ्यावे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता आणि इतर दैनंदिन कामांसाठी स्मार्ट कंपनीला शासनाकडून मक्ता देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित कंपनीकडून वेळेवर साफसफाई होत नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. तसेच साई मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सुमारे ६० ते ८० कामगारांचे काम अचानक बंद करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामगारांना कमी केल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व इतर महत्त्वाची कामे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली असून त्याचा परिणाम उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांच्या आरोग्यावर होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. काही सुशिक्षित युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक वसुली झाल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
कोरोना काळापासून सेवा देणाऱ्या अनेक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कमी करण्यात आलेल्या सर्व कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा संबंधित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीन कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला तीन मंत्रीपदे असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. तातडीने न्यूरोसर्जनची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आणि माजी नगरसेवक सुनील माळी यांनी दिला आहे.





