खान्देशगुन्हेजळगांव

दहिगावात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

दहिगावात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अवघ्या दहा दिवसांवर होता विवाह; शेतात रोटावेटरचे काम करताना काळाचा घाला

जामनेर (प्रतिनिधी) : दहिगाव येथे शेतीकाम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (२३ मे) दुपारच्या सुमारास घडली. योगेश यशवंत पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, काही दिवसांवरच त्याचा विवाह ठरलेला असल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील रहिवासी योगेश पाटील हा बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होता. दुपारच्या सुमारास काम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला. त्यानंतर तो रोटावेटरमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टर सुरू अवस्थेतच पुढे जात शेजारील शेतात पोहोचले. त्या वेळी निंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने हा प्रकार पाहताच घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर बंद केले. त्यानंतर त्याने तातडीने योगेशच्या कुटुंबीयांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेशला तत्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

विशेष म्हणजे, मृत योगेश पाटील याचा विवाह येत्या १८ जून रोजी होणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहिगाव गावासह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी राजेंद्र यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button