
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा स्वीकारला कार्यभार
कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख; विभागात पारदर्शकतेच्या अपेक्षा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोमवारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. गेल्या आठवड्यातच त्यांची या पदावर बदली करण्यात आली होती. वांद्रे-कुर्ला संकुल येथील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात त्यांनी पदभार हाती घेतला.
२००५ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. विविध प्रशासकीय पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कठोर कार्यपद्धतीची छाप उमटवली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागात अधिक शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सचिव दर्जाचे अधिकारी असूनही त्यांची नियुक्ती आयुक्तपदावर करण्यात आल्याने प्रशासनात या निर्णयाची चर्चा सुरू आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि नियमांबाबतच्या कठोर भूमिकेमुळे ओळख असलेले तुकाराम मुंढे आता नव्या जबाबदारीत कोणते निर्णय घेतात आणि विभागात काय बदल घडवून आणतात, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.





