
३.७२ कोटींच्या आर्थिक फसवणुकीत अनिल साहित्या यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर
संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्याच्या खरेदी-विक्री प्रकरण

जळगाव, प्रतिनिधी : ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात अनिल प्रेमचंद साहित्या यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्समधील कार्यालयाच्या व्यवहाराशी निगडित या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी फेटाळून लावला. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
या प्रकरणी सुरेश तलरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात २४१/२०२६ या क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशाल शर्मा आणि खुबचंद साहित्या यांच्यासह एकूण सात आरोपींचा या गुन्ह्यात समावेश आहे.
फिर्यादीतील माहितीनुसार, सदर कार्यालयाच्या व्यवहारादरम्यान महापालिकेच्या बांधकाम परवानगीसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित व्यवहारापोटी ३ कोटी ७२ लाख रुपये अदा केल्याचे, तसेच कार्यालयाच्या सजावट व फर्निचरवर ३५ लाख रुपये खर्च केल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे. ‘तारा इस्टेट’शी संबंधित या व्यवहारात महापालिकेची आवश्यक परवानगी नसल्याचेही नमूद करण्यात आले असून, १० जून २०२६ रोजी आणखी एक नोंदणीकृत विक्री व्यवहार झाल्याची बाब तक्रारीत मांडण्यात आली आहे.
अटकपूर्व जामिनावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेतले. हा प्रकार केवळ दिवाणी स्वरूपाचा असल्याचा बचाव अमान्य करत, आर्थिक उलाढाल आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. भंगाडिया-झावर यांनी अनिल प्रेमचंद साहित्या यांचा अर्ज नाकारला.
फिर्यादीच्या बाजूने ॲड. मुकेश शिंपी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.




