
जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २
बालचित्रपटांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जादूगार चेतनकुमार यांच्या जादूचे प्रयोग; भाऊंच्या उद्यानात विनामूल्य प्रवेश
जळगाव, प्रतिनिधी : बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना मनोरंजनाची अनोखी पर्वणी देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर रोजी हा दोन दिवसीय महोत्सव रंगणार आहे.

भाऊंचे उद्यान येथील ॲम्फी थिएटरमध्ये दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. बालविश्वाशी निगडित दर्जेदार आणि मनोरंजक बालचित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत.
यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित युवा जादूगार चेतनकुमार यांचे जादूचे प्रयोग. त्यांच्या हातचलाखीने आणि अविश्वसनीय जादूच्या प्रयोगांनी बालप्रेक्षकांसह मोठ्यांचेही मनोरंजन होणार आहे. त्यामुळे बालचित्रपटांसोबतच जादूच्या प्रयोगांची दुहेरी मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालक आणि मुलांना एकत्रितपणे वेळ घालवता यावा, त्यांनी चित्रपट आणि मनोरंजनाच्या माध्यमातून निखळ आनंद अनुभवावा, तसेच पालकांनाही आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देता यावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव शहरातील विद्यार्थी, बालचमू आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालचित्रपट आणि जादूच्या प्रयोगांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




