
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९७.०६ टक्के मतदान; १३ केंद्रांवर शंभर टक्के मतदान
२,९२१ पैकी २,८३५ मतदारांनी बजावला हक्क; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेदरम्यान शांतता कायम राहिली. दुपारी ४ वाजेपर्यंतच्या अंतिम आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण २,९२१ मतदारांपैकी २,८३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी ९७.०६ इतकी नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत विविध मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी लक्षणीय राहिली. जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव आणि एरंडोल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था (वि.का.) मतदारसंघांसह बोदवड आणि धरणगाव येथील इतर मतदारसंघांतही शंभर टक्के मतदान झाले. या १३ केंद्रांवरील सर्व पात्र मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविला.
शंभर टक्के मतदान झालेली केंद्रे वगळता जामनेरच्या इतर मतदारसंघात सर्वाधिक ९९.२२ टक्के मतदान झाले. येथे १२९ पैकी १२८ मतदारांनी मतदान केले. त्याखालोखाल पाचोरा इतर मतदारसंघात ९८.२८ टक्के, अमळनेर इतर मतदारसंघात ९८.१८ टक्के आणि चाळीसगाव इतर मतदारसंघात ९८.१५ टक्के मतदानाची नोंद झाली.
दुसरीकडे, यावलच्या इतर मतदारसंघात सर्वात कमी ९३.०९ टक्के मतदान झाले. येथे ३०४ पैकी २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जळगाव इतर मतदारसंघात ३१४ पैकी २९५ मतदारांनी मतदान केले असून, तेथील मतदानाची टक्केवारी ९३.९५ इतकी राहिली. चोपडा इतर मतदारसंघात १४४ पैकी १३५ मतदारांनी मतदान केले असून, येथे ९३.७५ टक्के मतदान झाले.
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत उच्च मतदानाची नोंद झाल्याने आता मतमोजणी आणि निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सहकारी संस्थांमधील प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.




