सामाजिकजळगांवराजकीय

गावच्या विकासाचा खरा हिरो ‘ग्रामसेवक’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

खान्देश टाइम्स न्यूज l २२ सप्टेंबर २०२४ l जळगाव l ग्रामीण भागातील जनतेचा खऱ्या अर्थाने विकास करायची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. ग्रामसेवक हा विकासाचा केंद्रबिंदू असून गावातील ग्रामस्थांच्या सर्वाधिक विश्वासाचा माणूस म्हणून ग्रामसेवकाची ओळख असल्याने गावच्या विकासाचा खरा हिरो हा ग्रामसेवक असतो असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांचे सह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष संजीव निकम , श्री भारंबे हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाचा सेवक म्हणजे ग्रामसेवक . राज्य व केंद्र शासनाच्या एकूण 160 योजना ग्रामसेवक तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवीत असतो, गावात राहून गावकऱ्यांची सेवा करणाऱ्या ग्रामसेवकावरच गावाचा सर्वात जास्त विश्वास असतो. त्यासोबतच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे नाते देखील ग्रामसेवकांशी घट्ट असते. ग्रामसेवक हा एक प्रकारे गावचे सरकार चालवीत असतो आणि त्याचमुळे ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा खरा कणा आहे. प्रशासनात आता अत्याधुनिक प्रणाली चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे ग्रामसेवकांनी देखील ही प्रणाली आत्मसात करून शासनाच्या विविध GR चा अभ्यास करून गावचा कारभार हाकताना अत्याधुनिक प्रणालीचा वापर करणं गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.

राज्याचे ग्रामविकास त्याचा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझा स्वतःचा राजकीय प्रवास ग्रामपंचायती पासून सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामसेवक काय असतो हे मला पूर्णपणे ज्ञात आहे. आमच्या सरकारच्या काळात आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची सुरुवात झाली आहे. ग्रामसेवक संघटनेच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याचे काम आम्ही करीत आहोत. आता देखील ग्रामसेवक संघटनेच्या काही मागण्यांबाबत लवकरच गोड बातमी देण्याचे काम आम्ही करणार आहोत. आता जवळपास सर्व योजनांचा पैसा थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग होत असल्याने ग्रामसेवकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच गावाचा विकास स्वच्छता, पर्यावरणाचा समतोल याकडे देखील ग्रामसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण होत आहे. त्याप्रमाणेच ग्रामसेवकांनी गाव आदर्श करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, ग्रामसेवक होणे ही सोपी गोष्ट नाही. गाव पातळीवरील आपसातले गैरसमज दूर करून आपली जबाबदारी पार पाडण्याचे काम ग्रामसेवक करीत असतो. आमच्या राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायत पासून झाल्यामुळे ग्रामसेवक काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी सरकारने ग्रामसेवकांवर सोपविले आहे. ही जबाबदारी पार पाडताना कसरत होत असली तरी ग्रामसेवक उत्कृष्टपणे काम करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळवित आहेत ही बाब गौरवास्पद असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगतातून ग्रामसेवकांच्या कार्याचे कौतुक करीत ग्रामसेवकांनी तंत्रज्ञानाची कास धरावी असे आवाहन उपस्थित ग्रामसेवकांना केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी देखील अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून ग्रामसेवकांनी ग्रामीण भागाच्या विकासात योगदान द्यावे असे सांगत सर्व पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामसेवकांचे अभिनंदन केले.

यावेळी गेल्या पाच वर्षातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 87 ग्रामसेवकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ देऊन आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने परिवारासह ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button