खान्देशजळगांवसामाजिक

परभणीत लोकशाही पत्रकार महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा; १५ नोव्हेंबरला आयोजन

परभणीत लोकशाही पत्रकार महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा; १५ नोव्हेंबरला आयोजन

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन; पत्रकार प्रशिक्षण, सहविचार बैठक व पदाधिकारी नियुक्ती सोहळा

जळगाव, प्रतिनिधी हमीद तडवी : पत्रकारांचे हक्क, संरक्षण आणि सन्मान यांसह पत्रकारितेतील विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी लोकशाही पत्रकार महासंघ, भारत यांच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी परभणी येथे राज्यस्तरीय सहविचार बैठक, पत्रकार प्रशिक्षण मेळावा आणि पदाधिकारी नियुक्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण आणि पोलीस अधीक्षक पंकज कुमावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संतोषकुमार जयस्वाल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतापराव साळुंखे, राष्ट्रीय महामंत्री टी. माधव, सरचिटणीस हलिमाताई शेख, दैनिक लोकनेताचे मुख्य संपादक तथा राष्ट्रीय संघटनमंत्री ज्ञानेश्वर बुधवत, जालना महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा दैनिक ज्योती बने ज्वालाच्या संपादिका आयेशा मुलानी, डिजिटल मीडिया अध्यक्ष मेहबूब शेख, राज्य संघटक रहीम खान आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांवर होणार मंथन

पत्रकारांचे हक्क, संरक्षण, सुरक्षा, सन्मान, पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, डिजिटल माध्यमांसमोरील आव्हाने, शासकीय योजना आणि पत्रकारांच्या विविध समस्यांवर मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार आहे. पत्रकारांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणे, त्यांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि राज्यभर संघटनात्मक ताकद वाढविणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

यावेळी महासंघाच्या विविध पदांवरील नियुक्त्याही जाहीर करण्यात येणार असून, आगामी संघटनात्मक वाटचालीची दिशा निश्चित केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार, मीडिया प्रतिनिधी तसेच राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांनी केले आहे.

कार्यक्रमाचा तपशील

दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६

वेळ : सकाळी ११.३० वाजता

स्थळ : सावली शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस), परभणी

संपर्क : ९८३४००९६५७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button