
दिवाळीच्या गर्दीत हरवलेली चार वर्षांची चिमुकली पोलिसांच्या तत्परतेने आईच्या कुशीत
महात्मा फुले मार्केट परिसरात अर्ध्या तासाच्या शोधानंतर मुलीचा लागला शोध; शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

जळगाव, प्रतिनिधी : दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त जळगावच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीत महात्मा फुले मार्केट परिसरात आईपासून दूर गेलेली चार वर्षांची चिमुकली हरवली. मुलगी दिसेनाशी झाल्याने आई घाबरून गेली आणि बाजारपेठेत तिचा शोध घेऊ लागली. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या शहर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून चिमुकलीला सुखरूप शोधून आईच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आईला मोठा दिलासा मिळाला.
गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या आदेशानुसार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जमशेर तडवी, रशीद खान, हवालदार राजीव जाधव आणि शैलेंद्र बाविस्कर हे टॉवर चौक ते प्रकाश मेडिकल परिसरात पायी गस्त घालत होते.
आईच्या तक्रारीने पोलिसांची धावपळ
महात्मा फुले मार्केटच्या गेट क्रमांक ३ जवळ एक महिला रडत असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, गर्दीत हात धरून चालणारी चार वर्षांची मुलगी अचानक हात सोडून निघून गेल्याचे तिने सांगितले. सणासुदीच्या गर्दीत मुलगी हरवल्याने आई चिंतेत होती.
पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला
महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी वेळ न दवडता मुलीचा शोध सुरू केला. पथकातील चारही जण वेगवेगळ्या दिशांना रवाना झाले. बाजारपेठेतील परिसरात शोध घेत असताना सुमारे अर्ध्या तासानंतर मार्केटच्या मागील बाजूस एका दुकानाजवळ चिमुकली उभी असल्याचे पोलिसांना आढळले.
पोलिसांनी मुलीला सुरक्षितपणे आईजवळ आणले. मुलगी सुखरूप परतल्याचे पाहताच आईचा जीव भांड्यात पडला. तिने मुलीला घट्ट मिठी मारली. काही वेळापूर्वी चिंतेने व्याकूळ झालेल्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला.
पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक
संबंधित महिलेचे सासर यावल तालुक्यात असून, ती माहेरी जळगाव येथे आली होती. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या या कुटुंबावर मुलगी हरवल्याने काही काळ संकट ओढवले होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकली सुखरूप सापडली आणि आई-मुलीची पुन्हा भेट झाली.
सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत नागरिकांच्या मदतीसाठीही पोलीस तत्पर असल्याचे या घटनेतून दिसून आले. हरवलेल्या चिमुकलीला शोधून आईच्या स्वाधीन करणाऱ्या शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.




