खान्देशजळगांवशिक्षण

रोझलँड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन

रोझलँड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन

संतोष प्रधान यांच्या हस्ते लोकार्पण; प्रा. आर. डी. वायकोळे यांना अनोखी श्रद्धांजली

जळगाव : पर्यावरणपूरक ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत रोझलँड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. “प्रा. श्री. आर. डी. वायकोळे यांच्या स्मृतीस कृतज्ञता आणि प्रेरणेने समर्पित” या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन संतोष प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मिलिंद वायकोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सॅनरोझ फाउंडेशन आणि डॉ. मिलिंद वायकोळे यांच्या संयुक्त पुढाकारातून हा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला असून, शाळेच्या अध्यक्षा सौ. रोजमिन खिमानी प्रधान यांच्या संकल्पनेतून त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमात सौर ऊर्जा ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता मान्यवरांनी व्यक्त केली.

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या कार्याला अभिवादन

प्रा. आर. डी. वायकोळे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते त्यांना “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ, उत्कृष्ट अध्यापनशैली आणि विविध शैक्षणिक प्रकल्पांतील योगदान आजही स्मरणात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ते शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. तसेच जळगावमधील पहिले आरसीसी सल्लागार म्हणूनही त्यांची ओळख होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांचे मार्गदर्शनही त्यांनी केले होते. त्यांच्या प्रेरणेतूनच हा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अफिफा खान हिने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सोहम पाटील याने ८४.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर सायमीन सैय्यद हिने ८४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. डॉ. मिलिंद वायकोळे आणि डॉ. सतीश दलिचंद ओसवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला मोजुद्दीन शेख, मनीषा बंब, वाय. एस. पाटील यांच्यासह रोझलँड मराठी माध्यमाचे प्राचार्य घोलाने सर, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या सौ. सीता तिवारी, नावेद निजामी, प्रवीण भोळे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button