
जळगाव शहरासह जिल्ह्यात ईद उल फित्र (रमजान ईद) उत्साहात साजरी
राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा दिला संदेश ; हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाजाच्या वतीने आज (दि. 31 मार्च 2025 रोजी) रमजान ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील एस टी वर्कशॉप परिसरातील ईदगाह् मैदानावर सकाळी नऊ वाजता शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुहीक नमाज पठन केले.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदचा सण आज जळगाव शहरासह संपुर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. रमजान ईद असल्याने आज (ता31) शहरातील तांबापुरा, भिलपुरा, शनिपेठ, शाहूनगर या ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी होती. ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे अजिंठा चौफुली नजीकच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी सर्व मानव जातीचे कल्याण होऊ दे, शेती आणि पिण्यासाठी पुरेसा पाऊस पडू दे, तसेच संपूर्ण विश्वात शांती लाभू दे, अशा मंगल कामनांसह प्रार्थना करण्यात आली.
ईदनिमित्त शहरातील विविध मान्यवरांनी ईदगाह मैदानात उपस्थित राहून मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या. तसेच पुष्पगुच्छ देऊन सौहार्दाचा संदेश दिला. ईद निमित्ताने शहरभर आनंदाचे वातावरण होते.
ईदनिमित्त बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विविध खाद्यपदार्थ, कपडे आदी खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होती. ईदचा शिरखुर्मा खाण्यासाठी ठिकठिकाणी नातेवाइकांना आमंत्रित करण्यात आले होते. नमाजपठणानंतर दुवाचा कार्यक्रम झाला. यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.