खान्देशगुन्हेजळगांव

कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

१५ दिवसांनी पाणी, तेही दूषित; स्वातंत्र्यदिनी अजिंठा महामार्ग रोखला, ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

१५ दिवसांनी पाणी, तेही दूषित; स्वातंत्र्यदिनी अजिंठा महामार्ग रोखला, ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

जळगाव | प्रतिनिधी — स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच कुसुंबा गावातील महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात तब्बल १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, त्यातही दूषित पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी अजिंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

पाण्याच्या थेंबासाठी महिलांची प्रतीक्षा

कुसुंबा ग्रामपंचायतीकडून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. १५ दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने पिण्याचे पाणी, स्वयंपाक तसेच दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्यातच नळाद्वारे येणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

तक्रारी करूनही दखल नाही

पाणीपुरवठ्याची समस्या वारंवार निदर्शनास आणून देऊनही अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी थेट अजिंठा महामार्गावर उतरून वाहतूक रोखली. अचानक झालेल्या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या.

‘किमान सहा दिवसांनी तरी पाणी द्या’

ग्रामस्थांना किमान सहा दिवसांच्या अंतराने नियमित आणि शुद्ध पाणी मिळावे, ही आंदोलनकर्त्या महिलांची प्रमुख मागणी होती. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कार्यालय बंद; महिलांचा संताप अनावर

विशेष म्हणजे, आंदोलनासाठी महिला रस्त्यावर उतरल्या असताना ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ आली असतानाही संबंधित प्रशासन उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली

रास्तारोकोची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर महिलांनी रास्तारोको मागे घेतल्याने अजिंठा महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाली. मात्र, कुसुंब्याचा पाणीप्रश्न तातडीने सोडवला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महिलांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button