
जेवणासाठी पती बाहेर गेला अन्… जुन्या जळगावात १८ वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; शनिपेठ पोलिसांत नोंद
जळगाव : पती जेवणासाठी बाहेर गेला असताना राहत्या घरात १८ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुने जळगाव भागात २१ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून, झिलीक टपन मंडल (वय १८, रा. जुने जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेले सुवर्ण कारागीर सनाजीत संत्रा हे जुन्या जळगाव परिसरातील एका भाड्याच्या खोलीत पत्नी झिलीक हिच्यासह राहत होते. २१ सप्टेंबर रोजी सनाजीत हे आपल्या दुकानमालकाकडे जेवणासाठी गेले होते. पती घराबाहेर पडल्यानंतर पत्नी झिलीक यांनी राहत्या घरात अज्ञात कारणावरून गळफास घेतला.
पती घरी परतताच उघडकीस आला प्रकार जेवण उरकून पती सनाजीत घरी परतले असता, पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार पाहताच त्यांनी टाहो फोडला. आसपासच्या नागरिकांनी तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
रुग्णालयात डॉक्टरांनी घोषित केले मृत घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




