
कांद्याच्या रोपांचा ट्रकला लागला धक्का अन् उडाला भडका; सावखेडासिम येथे दोन गटांत तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल
यावल (प्रतिनिधी) : शेतातील कांद्याच्या रोपांचे ट्रकने नुकसान केल्याचा जाब विचारल्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना सावखेडासिम येथे सोमवारी घडली. या वादामध्ये दोन्ही बाजूंचे दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडासिम येथील गायरान जाणाऱ्या रस्त्यावर शेत गट क्रमांक १५४ आहे. या शेताला लागून असलेल्या जमिनीत केळी भरण्यासाठी एक ट्रक आला होता. केळी भरताना या ट्रकचा धक्का लागून शेतातील कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले. यावरून आशाबाई कडू जयकर (रा. दहिगाव, ता. यावल) यांनी प्रकाश सुभाष पाटील व विजय विकास पाटील (दोघे रा. सावखेडासिम) यांना “कांद्याच्या रोपांचे नुकसान का केले?” असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद पेटला.
काठीने मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी आशाबाई जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जाब विचारल्याच्या रागातून प्रकाश पाटील व विजय पाटील या दोघांनी त्यांना अवाच्य शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केली. तसेच ‘जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. आशाबाई यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसांत दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करत आहेत.
दुसऱ्या गटाकडूनही गुन्हा दाखल
तर दुसरीकडे, दुसऱ्या गटातील प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकने कांद्याचे नुकसान केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात कडू चिंधू जयकर, पंकज कडू जयकर, परेश मधुकर तायडे व आशाबाई जयकर (सर्व रा. दहिगाव) या चौघांनी एकत्र येत शिवीगाळ केली आणि काठीने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी दहिगाव येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केवळ कांद्याच्या रोपांच्या नुकसानीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावल पोलीस पुढील तपास करत आहेत.




