
सावदा नगरपरिषदेला दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मिळावा
नगराध्यक्षा रेणुका पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सावदा | प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सावदा नगरपरिषदेला निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेला पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, संदर्भीय आदेशानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी निधी अनुज्ञेय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सावदा नगरपरिषदेसाठी या योजनेअंतर्गत अद्याप निधी वितरित करण्यात आलेला नाही.
सावदा शहरातील दलित वस्ती भागात विविध विकासकामे प्रस्तावित असून, ही कामे मार्गी लावण्यासाठी योजनेअंतर्गत निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रस्तावित कामांना मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक निधी सावदा नगरपरिषदेला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत सकारात्मक कार्यवाही करून सावदा नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.




