
मावशीच्याच घरी भाच्याचा दरोडा! रावेरमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या दोघांना २४ तासांत अटक; ५० हजारांच्या रोकडसह ३ तोळे सोने जप्त
रावेर (प्रतिनिधी) : रावेर शहरात दिवसा बंद घराचे कुलूप तोडून ५० हजार रुपयांची रोकड आणि ३ तोळे सोने चोरणाऱ्या भामट्यांना रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, या घरफोडीचा मास्टरमाइंड दुसरा कोणी नसून फिर्यादीचा स्वतःचा भाचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अंगणवाडी सेविकेच्या घरात चोरी
मिळालेली माहिती अशी की, रावेर येथील जुनी नगरपालिका रोडवरील मधुसूदन मेडिकलसमोर राहणाऱ्या कल्पना सुभाष वाणी (वय ५२, व्यवसाय: अंगणवाडी सेविका) या २० सप्टेंबर २०२६ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून अहिरवाडी येथे कामानिमित्त गेल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाची पाहणी केली असता ५० हजार रुपयांची रोख रक्कम, २ तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने लागला सुगावा
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. पथकाने शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दिवसा झालेली चोरी असल्याने आरोपींचा शोध घेताना सुरुवातीला अडचणी आल्या; मात्र एका कॅमेऱ्यात आरोपींचे चेहरे स्पष्ट कैद झाले होते. या फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.
अटक करण्यात आलेले आरोपी
१. रितेश रवींद्र नेवे (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागे, जळगाव) २. गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. ममुराबाद, इंदिरा नगर, ता. जि. जळगाव, ह.मु. सिलवासा, जि. नगर हवेली)
मावशी एकटी राहत असल्याचे माहीत असल्याने रचला कट
पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, संशयित रितेश नेवे हा फिर्यादी कल्पना वाणी यांच्या बहिणीचा मुलगा (भाचा) असल्याचे समोर आले. कौटुंबिक कारणामुळे दोन्ही कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून संपर्कात नव्हती. मावशी घरात एकटीच राहते आणि सकाळी कामावर जाते, हे रितेशला माहीत होते. याच संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्या मित्राच्या मदतीने मावशीच्याच घरावर दरोडा टाकला.
सगळा मुद्देमाल जप्त न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करत आरोपींकडून चोरीस गेलेले ३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
तपास पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि हरिदास बोचरे करत आहेत.




