खान्देशगुन्हेजळगांव

नशिराबाद पोलिसांचा दणका; २९ उपद्रवी गुन्हेगार हद्दपार !

 नशिराबाद पोलिसांचा दणका; २९ उपद्रवी गुन्हेगार हद्दपार !

BNSS कलम १६३(३) अन्वये कारवाई; २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस ठाणे हद्दीत प्रवेशास मनाई

जळगाव | प्रतिनिधी

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा, यासाठी नशिराबाद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असलेल्या नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल २९ जणांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तात्काळ बाहेर जाण्याचे आदेश बजावण्यात आले असून, २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांना या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा बसावा आणि उत्सव काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने नशिराबाद पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उत्सव काळात शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

हद्दीबाहेर जाण्याचे आदेश बजावण्यात आलेल्या २९ जणांमध्ये नशिराबादसह देव्हारी, कंडारी आणि कडगाव येथील व्यक्तींचा समावेश आहे. संबंधितांना आदेशाची मुदत संपेपर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वावरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करून संबंधितांनी विनापरवानगी नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिसांकडून हद्दीत करडी नजर ठेवण्यात येणार असून, संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा शांतता, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचा सण असल्याने नागरिकांनी उत्साह कायम ठेवत कायद्याचे पालन करून सण शांततेत साजरा करावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button