खान्देशगुन्हेजळगांव

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट, मेहुणबारे पोलिसांची कारवाई

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट, मेहुणबारे पोलिसांची कारवाई

चाळीसगाव/मेहुणबारे (प्रतिनिधी) : जामदा शिवारातील गिरणा नदीकाठच्या गावठाण जमिनीवरील काटेरी झुडपांच्या आडोशाने सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर मेहुणबारे पोलिसांनी आज, २२ सप्टेंबर रोजी छापा टाकला. या कारवाईत सुमारे ३० हजार रुपये किमतीचे गुळ व नवसागरमिश्रित ६०० लिटर कच्चे-पक्के रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर धर्मा गोकुळ (रा. जामदा, ता. चाळीसगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

गुप्त बातमीच्या आधारे कारवाई जामदा शिवारात गिरणा नदीकाठालगत असलेल्या काटेरी झुडपांमध्ये सागर गोकुळ हा अवैध गावठी हातभट्टी लावून दारू तयार करत असल्याची गुप्त बातमी परिभ्रमण पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिले यांना मिळाली होती. या बातमीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली.

६०० लिटर रसायन नष्ट पोलीस पथकाने भट्टीवर छापा मारून पाहणी केली असता, तेथे १०० लिटर क्षमतेच्या ६ प्लास्टिक ड्रममध्ये भरलेले सुमारे ६०० लिटर गुळ व नवसागरमिश्रित फसफसणारे रसायन आढळून आले. सुमारे ३० हजार रुपये मूल्याचा हा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळीच नष्ट केला. तसेच भट्टी चालवणाऱ्या सागर धर्मा गोकुळ यास पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल या प्रकरणी पोलीस अंमलदार दीपक महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित सागर गोकुळ याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई परिभ्रमण पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विश्वास देशमुख, प्रकाश कोळी, योगेश पाटील, विनोद बेलदार आणि दीपक महाजन यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button