
निधी फाउंडेशन पुन्हा मदतीला : प्रवासी महिलेला रेल्वेत इटारसीला मिळाला आधार!
जळगाव, – ‘मासिक पाळी’ विषयावर आजही कुणी फारसे बोलत नाही. मासिक पाळी केव्हा येईल हे देखील निश्चित सांगता येत नाही. रेल्वेने आपल्या चिमुकलीसह प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत असेच काही घडले. धावत्या रेल्वेत मासिक पाळी आल्याने महिलेची कुचंबना झाली. मुलीला एकटीला सोडू शकत नाही आणि रेल्वेत कुणाला मागू शकत नाही. सर्व अवघड परिस्थितीत महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी फाउंडेशन जळगावचा क्रमांक मिळाला. संपर्क साधताच अवघ्या तासाभरात तिला इटारसी स्थानकावर सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले.
जळगाव जिल्ह्यातील सेवाभावी संस्था निधी फाउंडेशनने पुन्हा एकदा आपल्या मानवी सेवाभावाला सिद्ध केले आहे. मासिक पाळी विषयावर कार्य करणाऱ्या फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दानापूर-पुणे एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेला रेल्वे प्रवासात अचानक आलेल्या अडचणीतून निधी फाउंडेशनने सावरले.
सोशल मीडियाद्वारे साधला संपर्क
एक ३० वर्षीय महिला दानापूर-पुणे एक्सप्रेसने आपल्या चिमुकलीसह प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान तिला अचानक सॅनिटरी पॅडची गरज भासली. या परिस्थितीत ती अत्यंत अस्वस्थ झाली होती. रेल्वेत कुणाला मदत मागू शकत नसल्याने तिने सोशल मीडियाची मदत घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला निधी फाउंडेशनचा संपर्क क्रमांक मिळाला. महिलेने संपर्क साधत अडचण सांगितली आणि तासाभरात रेल्वे इटारसी स्थानकावर पोहचणार असल्याचे कळवले.
जळगावातून मदतीचा हात पोहचला इटारसीला..
निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते या जळगावात होत्या. महिलेला गरज असल्याने त्यांनी लागलीच आपल्या परिचयातील व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे सुचविले. इटारसी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोहचताच महिलेच्या हाती सॅनिटरी नॅपकिन मिळाले. महिलेने लागलीच फोन करून निधी फाउंडेशनचे आभार मानले.
रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
गेल्या वर्षी देखील निधी फाउंडेशनच्या माध्यमातून एका महिलेची मदत करण्यात आली होती. आजच्या घटनेने पुन्हा एकदा मानवी सेवाभावाला उजागर केले आहे. निधी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना मदत मिळत आहे. निधी फाउंडेशनच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येक रेल्वेत सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी गेल्या ३ वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी दिली आहे.