इतर

महायुतीत सर्व काही आलबेल नाही? जळगाव विधान परिषदेत बंडखोरीची ठिणगी; ‘संकटमोचका’च्या जिल्ह्यातच रणनीतीला धक्का!

रेश्मा काळे मैदानात कायम; विष्णू भंगाळे थेट गिरीश महाजनांना नडल्याची सोशल मीडियावर चर्चा, फोन बंद असल्याने सस्पेन्स वाढला!

महायुतीत सर्व काही आलबेल नाही? जळगाव विधान परिषदेत बंडखोरीची ठिणगी; ‘संकटमोचका’च्या जिल्ह्यातच रणनीतीला धक्का!

रेश्मा काळे मैदानात कायम; विष्णू भंगाळे थेट गिरीश महाजनांना नडल्याची सोशल मीडियावर चर्चा, फोन बंद असल्याने सस्पेन्स वाढला!

जळगाव I प्रतिनिधी
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता थेट चव्हाट्यावर आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी जिल्ह्यात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्याचे संकटमोचक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी स्वतः मैदानात उतरून बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही महायुतीत बंडखोरीची ठिणगी पडल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना आता पूर्णपणे नवे वळण मिळाले आहे.

गिरीश महाजनांचे प्रयत्न अपुरे; अनिल चौधरी रिंगणात कायम

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची अंतिम मुदत होती. भाजपचे नेते नामदार गिरीश महाजन यांनी स्वतः लक्ष घालत अनेक इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यात यश मिळवले आणि काहींनी माघारही घेतली. मात्र, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांनी कोणाचेही न ऐकता निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीच्या गोटात पहिली अस्वस्थता निर्माण झाली.

रेश्मा काळे यांच्या उमेदवारीने महायुतीची डोकेदुखी वाढली!

या संपूर्ण घडामोडींमध्ये सर्वात मोठा धक्का ठरली ती शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या रेश्मा काळे यांची भूमिका. माघारीच्या वेळेपर्यंत त्या अर्ज मागे घेतील अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, रेश्मा काळे यांच्या या बंडखोरीमागे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला आघाडीच्या नेत्या सरिता माळी-कोल्हे यांची पडद्यामागून महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. मित्रपक्षातील नेत्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीचे ऐक्य केवळ नावापुरतेच आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

सोशल मीडियावर पोस्टचा महापूर; महाजनांच्या प्रतिष्ठेची लढाई

या नाट्यमय घडामोडींचे पडसाद सोशल मीडियावरही तीव्रतेने उमटत आहेत. “जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे थेट गिरीश महाजनांना नडले”, “राज्याचे संकटमोचक स्वतःच्याच जिल्ह्यात निवडणूक बिनविरोध करू शकले नाहीत”, अशा आशयाच्या चुरसदार पोस्ट आणि मीम्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. जळगाव जिल्ह्यात भाजपचे अभेद्य नेतृत्व मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासाठी आता ही निवडणूक केवळ विधान परिषदेची जागा जिंकण्याची राहिलेली नाही, तर ती त्यांच्या वैयक्तिक राजकीय वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

विष्णू भंगाळे यांचा मोबाईल बंद; सस्पेन्स अधिकच गडद

महायुतीत निर्माण झालेल्या या मोठ्या खिंडाराविषयी आणि बंडखोरीला मिळालेल्या छुप्या पाठिंब्याविषयी अधिकृत बाजू जाणून घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाईल फोन बंद येत असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. भंगाळे यांनी मोबाईल बंद ठेवल्याने राजकीय वर्तुळातील सस्पेन्स आणि चर्चांना उधाण आले असून, विरोधी गटांनी निर्माण केलेल्या या आव्हानामुळे जळगावचा हा राजकीय पट कमालीचा गुंतागुंतीचा बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button