शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप
सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे; ढोल-ताशांच्या गजरात सुशोभीकरणाचा शुभारंभ
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या शहरातील शिवतीर्थ चौकाला आता शिवकालीन वैभवाचा नवा साज लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील दुभाजक परिसरात शिवकालीन मावळ्यांची भव्य व आकर्षक शिल्पे उभारण्यात आली असून, त्यामुळे चौकाच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे.
जी.एम. फाउंडेशनची संकल्पना; सुप्रीम इंडस्ट्रीजचे योगदान
जी.एम. फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाला सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने संपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उद्योग आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळत आहे.
मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत शुभारंभ
या सुशोभीकरणाचा शुभारंभ जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवणे, महापौर दीपमाळा काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, मान्यवर, सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात शिवमय वातावरण
शुभारंभ सोहळ्यात सुगंध, शिवसूर्य, शौर्यवीर आणि शिव तांडव या ढोल पथकांनी दमदार वादनातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना मानवंदना दिली. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण शिवतीर्थ चौक दुमदुमून गेला. या उत्साही वातावरणामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
मावळ्यांच्या शौर्याची जिवंत अनुभूती
शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जळगावकरांच्या अस्मितेचे आणि अभिमानाचे प्रतीक मानला जातो. आता त्यासमोरील परिसरात उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या प्रतिकृतींमुळे चौकाला शिवकालीन इतिहासाची जिवंत अनुभूती मिळत आहे. स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या सुशोभीकरणातून होणार आहे.
शहराच्या सौंदर्यात मानाचा तुरा
सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणाला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची जोड दिल्यास शहराच्या सौंदर्यात वेगळे वैभव निर्माण होते, हे शिवतीर्थ चौकाच्या नव्या रूपातून अधोरेखित झाले आहे. दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मावळ्यांच्या शौर्याची प्रेरणा या शिल्पांमधून मिळणार आहे.
जी.एम. फाउंडेशनची संकल्पना आणि सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनचे योगदान यामुळे शिवतीर्थ चौकाला मिळालेले हे नवे रूप जळगावच्या सौंदर्यातील महत्त्वाचा मानबिंदू ठरणार आहे.





