
नात्याला काळिमा! नराधम मावसाकडून अल्पवयीन भाचीवर अत्याचार; मुलगी राहिली गर्भवती
तालुका पोलिसांत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; संशयित नराधमास बेड्या
जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ३४ वर्षीय नराधम मावसा ने आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
दिवाळीच्या काळात घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२५ मधील दिवाळी सणाच्या १५ दिवस आधी पीडित मुलगी घरात एकटी असताना संशयित आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेतला. तिची इच्छा नसताना तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याने पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
पीडित मुलीच्या शरीरात बदल झाल्याने आणि प्रकृती खालावल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयाकडून ही माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी पीडितेचा विश्वास संपादन करून जबाब घेतला असता, तिने तिच्या मावसानेच हे कृत्य केल्याचे सांगितले.
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध अत्याचार आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत नराधम मावसाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.





