भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तांवर ईडीची धडक कारवाई

भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तांवर ईडीची धडक कारवाई
जामनेर, जळगाव व फत्तेपूर येथील ठिकाणांवर तपासणी
जळगाव : भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांवर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) च्या पथकाने बुधवारी पहाटेपासून उशिरापर्यंत धडक कारवाई केली. तब्बल १३ ते १४ तास चाललेल्या या तपासणीत ईडीच्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांसह केंद्रीय राखीव दलाच्या शस्त्रधारी जवानांचा बंदोबस्त होता.
पहाटे सहा वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान, जामनेर येथील लोढा यांचे निवासस्थान, जळगावातील मुलाचे घर आणि फत्तेपूर येथील मालमत्तांवर छापा टाकून कागदपत्रे व विविध दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.
प्रफुल्ल लोढा सध्या महिला अत्याचार आणि कथित हनीट्रॅप प्रकरणात मुंबई कारागृहात असल्याने या तपासणीला विशेष महत्त्व आले आहे. ईडीच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून लोढा यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





