इतर

वैजापूर वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड करणारे तिघे पकडले !

वैजापूर वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड करणारे तिघे पकडले !

सागवानाचे 14 ओंडके व दोन दुचाकी जप्त; वनविभागाची धडाकेबाज कारवाई

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर वनक्षेत्रातील मालापूर उत्तर (कक्ष क्र. 231) भागात वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून अवैध वृक्षतोड करणाऱ्या तिघांना पकडले. शनिवारी सकाळी वनअधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना कुऱ्हाडीच्या आवाजाच्या दिशेने जाताच आरोपी पसार होऊ लागले. मात्र स्टाफने वेळीच घेराव घालून त्यांना पकडण्यात यश मिळवले.

तपासात आरोपींकडून 14 नग सागवानाचे ओंडके जप्त करण्यात आले असून त्याचे मोजमाप 0.579 घनमीटर एवढे आहे. या लाकडाची किंमत अंदाजे 13,275 रुपये एवढी असून, घटनास्थळी आरोपींनी लपवून ठेवलेल्या दोन मोटारसायकली (किंमत 45,000 रुपये) देखील जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी वनरक्षक, मालापूर उत्तर यांनी प्रथम गुन्हा नोंदवला आहे. कारवाई धुळे प्रादेशिक वनसंरक्षक म. निनू सोमराज, यावल उपवनसंरक्षक म. जमीर शेख, विभागीय वनाधिकारी दक्षता धुळे म. राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक म. एम. बी. पाटील (चोपडा), म. समाधान पाटील (यावल) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर म. विकेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपाल, वनरक्षक, वनसेवक व वाहनचालक सहभागी होते.

दरम्यान, वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी म. विकेश ठाकरे यांनी आवाहन केले आहे की, “वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड, लाकूड वाहतूक, अतिक्रमण किंवा वन्यजीव तस्करी यासारखा प्रकार आढळल्यास तात्काळ शासनाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button