नोकरीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाने राहत्या खोलीत घेतला गळफास

नोकरीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाने राहत्या खोलीत घेतला गळफास
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसीतील कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. अजय बुधराम पाटील (वय २२, रा. अंबेरी, ता. नेपानगर, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अजय पाटील हा गेल्या काही महिन्यांपासून रोजगारासाठी जळगावातील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने विवाह केला होता आणि पत्नीला घेऊन येथे राहत होता. बुधवारी नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून तो घरी आला. पत्नीसोबत जेवण करून काही वेळाने झोपायला गेला.
काही वेळाने पत्नीने आवराआवर करून खोलीत प्रवेश केला असता, अजयने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. आरडाओरड झाल्यावर शेजारील व कंपनीतील काही सहकाऱ्यांनी धाव घेत अजयला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
ही घटना अत्यंत वेदनादायक असून, नवविवाहित पत्नीवर मानसिक आघात झाला आहे. अजयने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.